अन पाऊस धो धो रडला
लेक लाडाची अवनी,
तहानलेली नऊ मास,
आला भेटाया लेकीला,
बाप मायाळू पाऊस…
बरसला रानोमाळी,
भरली नदी अन तळी,
देऊ काय ? अन किती ?,
लेक माझी लेकुरवाळी…
आनंदली झाडं वेली,
चिंब न्हाऊन निघाली,
वाऱ्याच्या सरीसंगे,
नाचू डोलू लागली…
गेला ढगांच्या बाजारी,
घेतला शालू भरजरी,
लेणं लेवून हिरवं,
लेक दिसे नवी नवरी…
भाऊ सूर्या हा थोरला,
अन चंद्र तो धाकला,
रोज येती भेटायला,
माझे येणे वरीसाला…
म्हणे लेक ती बापाला,
नका लावू हो मनाला,
लेक सुखी आहे तुमची,
चिंता फक्त लेकरांची…
बोल एकूण लेकीचे,
आवंढा गळ्याशी दाटला,
विजेच्या आडोशाला,
पाऊस धो धो रडला…
कवी:- नंदकिशोर बोधक